पराभव दिसू लागल्याने राणा पाटलांचा निवडणूक आयोगावर दबाव.

तुळजापूर (प्रतिनिधी):- धीरज जाधव:- तुळजापूर २४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाची विद्यमान आमदार राणा पाटील यांच्यावरील नाराजी असल्याचं सांगितलं. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्यामागे मनोज जरांगे असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय उद्या दिनांक १०-११-२०२४ रोजी बाळासाहेब आंबेडकर यांची धाराशिव येथे होणाऱ्या सभेबद्दलची माहिती त्यांनी दिली.
⁃ प्रचारावर मर्यादा, लोकशाहीची हत्या
डॉ. सोनकाटे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरुन सोनकाटे यांचा प्रचार मर्यादित केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “मला निवडणूक आयोगाकडून पत्र आले आहे. या पत्रात त्यांनी राणा पाटलांची पाठराखण करण्यासाठी माझ्या प्रचारावर मर्यादा घातल्या आहेत. तुळजापूर- धाराशिवमधील मतदारांची मते घ्यायची. विकासाची बारी आली, शिक्षण संस्था, दवाखाने उभारण्याची बारी आली की मुंबई- पुणे गाठायचे. मतदारांना त्यांच्या लेकरांना शिक्षण आणि आरोग्यापासून दुर ठेवायचं. हे घाणेरडं राजकारण आम्ही प्राचाराच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवणे गुन्हा आहे का?”
⁃ हाकेंवर हल्ला जरांगेंमुळं, जरांगेंना ताकद राणांमुळं
दोन दिवसांपुर्वी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नांदेडच्या कंधारमध्ये हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामागे मनोज जरांगे असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “प्रा. लक्ष्मण हाकेंवरील हा हल्ला मराठा नेते मनोज जरांगेंच्या सांगण्यावरुन झाला. बाळासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादाने माझ्याकडून त्यांचा होणारा पराभव राणा पाटलांना स्पष्टपणे दिसतो आहे. त्यामुळे माझ्या प्रचार यंत्रणेला रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.”
– उद्याची सभा विजयाची
उद्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर धाराशिव येथे सभा घेणार आहेत. या सभेबद्दल माहिती देताना सोनकाटे म्हणाल्या, “१० नोव्हेंबरला हा माझ्या प्रचाराचा दिवस नाही. तो माझ्यासह धाराशिव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा दिवस आहे. निकालाचा दिवस फक्त औपचारिकता राहणार आहे. मी मतदारसंघातील सर्व जनतेला, जेष्ठांना, तरुण मित्रमंडळींना, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम बांधवांना आवाहन करते की आपण या सभेला उपस्थित रहावं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरु असलेल्या लढ्यात आपण योगदान द्यावं.” असं आवाहन त्यांनी केलं.