आपल धाराशिवताज्या बातम्या

श्री आई तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम वेगात

तुळजापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू आहे. भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित केलेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हजारो वर्षांच्या अनमोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देविभक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा याची देही याची डोळे मनभरून पाहता येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरावी इतके महनीय आहे. हा प्राचीन आणि वैभवशाली वारसा ठळकपणे देश आणि जगाच्या पर्यटकांसमोर मांडण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी तिर्थक्षेत्राचा संपुर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींची आराखडा अंतिम करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे सध्या वेगात सुरू आहेत. यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लक्षवेधी प्राचीन झळाळी लाभणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या टोळभैरव मंदिरातील टाइल्स फरशा काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या फरशा काढून पुरातन आकार देण्याचे काम पुरातत्त्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे. वर्षातून केवळ एक वेळा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या टोळभैरवाच्या मंदिराचे प्राचीन आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. मंदिर परिसरात असलेल्या दत्तमंदिराच्या कामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यात आले असून जुन्या कोरीव दगडांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. आकर्षक कोरीव काम असलेल्या या दगडांना अधिक ठळकपणे जीर्णोद्धाराच्या कामातून भाविकांसमोर आणले जाणार आहे. गोमुखतीर्थ आणि परिसरातही जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आहे. त्या ठिकाणीही मोठे लोखंडी स्ट्रक्चर उभारून पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली मोठया वेगात काम सुरू आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून कामाचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येईल, याकडे विचारपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अत्यंत उत्साहामध्ये आणि समाधानाने प्रत्येक भक्त आपल्या घरी जावा, असे नियोजन आम्ही करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

जिर्णोद्धारात या कामांचा समावेश

मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन प्रशासकीय इमारती, पोलीस चौकी, खुला प्रेक्षा मंच आदी नव्याने केलेेली बांधकाम काढली जाणार आहेत. गोमुखतीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळतीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्तीचे कामही केले जाणार आहे. तिसर्‍या टप्प्यात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकतेनुसार दगडी पायर्‍या, महावस्त्र अर्पण केंद्राचेही जतन आणि दुरूस्तीचे काम नियोजित आहे. तुकोजीबुवा मठावरील ओव्हर्‍या, आराध्य खोली, दगडी फरशी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर जिजामाता महाद्वाराची देखील दुरूस्ती आणि जतन केले जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button