नागरिक पितात दूषित पाणी: पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती…

पालघर:- (प्रतिनिधी):- सुशांत संखे :- पालघर| जिल्ह्यात सूर्या प्रकल्पासह काही महत्त्वाची धरणेही आहेत. या जिल्ह्यातून मुंबईसह वसई विरार, मीरा-भाईंदर या भागांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र खुद्द पालघर जिल्ह्यातील नागरिकांचा घसा कोरडाच असल्याचीही स्थिती आहे. यावरून ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असेही बोलले जात आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यांतील जांभळीचा माळ गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘हर घर जल योजने’चा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी ग्रामीण भागातील काही गावे मात्र या योजनेपासून कोसो मैल दूर आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरापासून अवघ्या पाच-सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जांभळीचा माळ या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात नागरिकांना जंतू आणि किडेमिश्रित दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या गावाची ही व्यथा असेल, तर दुर्गम भागात काय होत असेल, याची कल्पनाच करता येत नाही. पालघर जिल्हा आदिवासी असूनही या भागात योजनांसाठी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. मात्र अजूनही या भागातील लोकांना पाणी मिळत नाही.
*टंचाई असताना टँकर नाही*
जव्हार तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असले, तरी या गावाला मात्र टँकर सुरू करण्यात आले नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षापासून जांभळ माळ पाणीटंचाईचा सामना करतो आहे. निवडणुकीच्या वेळी मतदान मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आश्वासनांचा पाऊस पाडतात; परंतु नंतर मात्र पिण्याच्या पाण्याचे आश्वासन पूर्ण करण्याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होते.
*विहिरी आटल्या, झरे कोरडे*
जांभळीचा माळ परिसरातील सर्व विहिरी आटल्या आहेत. झरे कोरडे पडले आहेत. ग्रामपंचायतीने बांधलेल्या विहिरीतील पाणी अत्यंत दूषित असून वापरण्यायोग्य नाही.या गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी महिलांना दोन-तीन हंडे घेऊन जावे लागते. शाळेतील चौथी-पाचवीच्या मुलींनाही दऱ्या, खोऱ्यात असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी जुंपले जाते. ही मुले तयार नसली, तरी पालक बळजबरीने त्यांना तयार करतात. दोन दोन हांडे घेऊन मान मोडून ही मुले दऱ्या, खोऱ्यातून पाणी आणतात.
………
*त्वचाविकारांना निमंत्रण*
हे पाणी दूषित असून ते गाळ, किडे आणि जंतूमिश्रित आहे, हे पाणी प्यावे असे नागरिकांना वाटत नाही; परंतु त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. या महिला गाळून पाणी पितात; परंतु मुळातच हे पाणी दूषित असल्याने नागरिकांना त्वचा विकारांना तसेच पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागते. सर्दी, खोकल्यासह अन्य आजारही पाठ सोडत नाहीत. या विहिरीतील पाण्याच जंतूनाशकेही टाकली जात नाहीत. काही महिलांना तर पन्नास-साठ वर्षापासून असेच पाणी आणण्याचे काम करावे लागत असल्याचे त्यांचे अनुभव आहेत.
…………
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबद्दल खंत
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच अन्य लोकप्रतिनिधी जांभळीचा माळच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत नाही, अशी खंत या महिला व्यक्त करतात. जव्हार शहरापासून जवळ असलेल्या या गावासाठी कायमस्वरूपी पाणी योजना राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांना अनारोग्याच्या समस्येतून कायमचे सोडवण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्यांना निकाली काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
|”या भागातील आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन, जल सुराज्य, हर घर जल, हर घर नल, इत्यादी महत्वाच्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ‘धरण उशाला आणि तहान घशाला ‘ अशी अवस्था या भागातील जनतेची झाली आहे. शासनाने त्वरित पाणी समस्या सोडवावी.”
(चंद्रकांत खुताडे, सामाजिक कार्यकर्ते )|
|” या भागातील पाणी प्रश्न गंभीर असून आदिवासी महिलांना पाण्यासाठी कित्येक किमी ची पायपीट करावी लागते. त्यांच्या सोबत शाळकरी मुलींना देखील पाण्यासाठी भटकंती करावी, हे चिंताजनक आहे. यामुळे भविष्यात अनेक मुलींना शिक्षण सोडण्याची वेळ येऊ शकते. शासनाने याबाबत न्यायोचित पाऊल टाकून पाणी समस्या सोडवावी.”
(रजनी पांढरे , सामाजिक कार्यकर्त्या|