सरावली अवधनगर शासकीय भूखंडावर बांधकामे जोमात… जुन्या इमारतीवर अजून एक मजला; पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका…

|अनधिकृत बांधकामांना आज अभय मिळत आहे. इतर बेकायदा बांधकामांना पोलिस बंदोबस्त दिला जातो. आरक्षित भूखंडावरील बांधकामांना मात्र दिला जात नाही. वरून दबाव आल्यामुळे पोलिस बंदोबस्त दिला जात नाही, दरवेळेस असे होते. यामुळे बेकायदा बांधकामे वाढत आहेत.|
सुशांत संखे :- बोईसर | अवधनगर हद्दीतील बेकायदा बांधकाम तोडायचे असेल तर पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली जाते. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत अनेकदा महसूल अधिकारी या कारवाईत चाल ढकल करतात; तर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे महसूल अधिकारी आणि पोलिस प्रशासन या दोघांच्या या वेळकाढूपणामुळे शहरात बेकायदा बांधकामांना अभय मिळत आहे. अवधनगर येथे असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाईचे दोनदा आदेश निघाले, परंतु पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
शहरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झपाट्याने सुरू आहेत. कारवाई होऊनही पुन्हा त्या ठिकाणी बांधकाम हे भूमाफिया करत आहेत. अशा अनेक इमारती शहरात कारवाई झाल्यानंतर पुन्हा उभ्या राहिल्या असून त्यात नागरीक देखील राहण्यास आले आहेत. तर जुन्या इमारतीवर अजून एक मजला चडवून पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका असताना मात्र ग्रामपंचायत सरावली व महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.
दरम्यान सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथिल सरकारी भूखंडावर बांधकाम जोमात सुरू असताना आज सुट्टीचा वार पाहता जुन्या इमारतीवर अजून एक मजला चडवण्याचा काम जोमाने सुरू असून सरावली ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून नेमकी कुठली कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.