मोकळ्या जागेवर रासायनिक घनकचरा जाळण्याचा प्रयत्न…

पालघर :-(प्रतिनिधी):- |प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळेच येथील अनधिकृत व्यवसाय वाढतच चालले आहेत. भरमसाट कर भरत असून हक्काचा शुद्ध प्राणवायू येथे मिळत नाही. तो तरी मोफत मिळणार की नाही, की त्यासाठीही कर भरावा लागणार? असा संतप्त प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.|
प्रतिक मयेकर
बोईसर | तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घनकचरा बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी दिवसेनदिवस कारखानदार अनोखी शक्कल लढवत असून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी येणारा लाखोंचा खर्च टाळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील राखीव भूखंडावर हे कारखानदार आपला रासायनिक घनकचरा खुलेआम जाळत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एस -१० समोरील वनीकरणासाठी राखीव असलेल्या ओ एस -६४ या भूखंडावर रासायनिक घनकचरा जाळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात उत्पादन प्रक्रिया दरम्यान तयार होणारा रासायनिक घनकचरा बेकायदेशीर विल्हेवाट लावणारी गावगुंड टोळकी सक्रिय झालेली असून या टोळीच्या साह्याने कारखानदार आपला रासायनिक घनकचरा खुलेआम जाळण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा भूमी लगतच हा सर्व प्रकार सुरू असून पर्यावरणावर प्रेमाचा खोटा आव आणणाऱ्या कोलवडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पर्यावरण प्रेमी या वारंवार सुरू असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.