माईंचे कार्य आजही त्यांच्याच पद्धतीने चालू आहे – ममताताई सपकाळ ममता सिंधुताई सपकाळ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान

तुळजापूर (प्रतिनिधी):- माणसाच्या जगण्यामध्ये काही उणिवा असतील तर त्या उणिवा पूर्ण करत असताना जो संघर्ष केला जातो तो संघर्ष इतिहास निर्माण करतो आणि माईंनी जे सोसलं त्यामुळेच त्यांनी हे सामाजिक कार्य व सेवा प्रकल्प उभे केले. जे माईंनी काम सुरू केलं होतं ते आयुष्यभर सुरू ठेवलं तेच काम पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि माईंचे ते काम आजही त्यांच्याच पद्धतीने चालू आहे हे सांगताना मला माझं मन भरून आला आहे असेही हिरकणी पुरस्कार प्राप्त समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाई नगरीत पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गजलकार ममता सपकाळ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार गुरुवर्य ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर आणि गुरुवर्य महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप तुळजाभवानी मातेला नेसवलेली मानाची पैठणी, कवड्याची माळ, शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे होते. पुजारी नगर फाऊंडेशन तर्फे अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत ममताताईंना देण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी माझी आई मला एक दिवसासाठी आणून द्या.अशी भावस्पर्शी कविता सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी मी पहिल्यांदाच नतमस्तक झाले आहे मी तुळजापूरकरांची सदैव ऋणी राहील अशा शब्दात त्यांनी या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्कार भारती प्रदेशाध्यक्षा स्नेहल पाठक, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनूर सय्यद, मंदिर तहसीलदार माया माने, विनय सिंधुताई सपकाळ, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, शुभांगी पुजारी आदींची उपस्थिती होती. पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे, प्रास्ताविक अनिल आगलावे तर आभार डॉ.सतीश महामुनी यांनी मानले.
चौकट
आई असेल पण माया नाही,समाज असेल पण करुणा नाही,लोक असतील पण जिव्हाळा नाही जिवनात जर ममता नसेल तर काय उपयोग.वास्तवाचा स्वीकारने खूप अवघड आहे, दुःखाचा स्वीकार करा जशी स्थिती आहे तसे राहिले पाहीजे,ज्याला जगाने अनाथ केले,कर्माने अनाथ केले,परिस्थितीने अनाथ केले, त्या अनाथांना मायेची उभ दिली, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांनी वास्तवाचा सामना केला त्यांचाच समाजसेवेच्या विचाराचा वारसा ममता तुम्ही चालवत आहात हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे भावोद्गागार गुरुवर्य हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक स्नेहलताई पाठक यांनी पायाला खडा टोचला म्हणून डोळ्यात पाणी आणण्याऐवजी ज्यांना पाय नाही आहेत त्यांचे दुःख पहावे म्हणजे आपले दुःख निश्चित कमी होईल असे उदाहरण दिले. ममता ताई बोलत असताना हृदय गलबलून गेलं आईची शिदोरी सरत नाही आणि संपतही नाही या ममता ताई यांच्या कृतज्ञतेची भावना त्यांच्या आईचा वारसा आणि उभं केलेलं समाजकार्य याला आम्ही सलाम करतो असेही स्नेहलताई यांनी यानिमित्ताने सांगितले.