धाराशिवमध्ये खेळांच्या माध्यमातून लैंगिक समानतेचे धडे बनले लोकप्रिय जिल्हा प्रशासन व युनिसेफतर्फे लैंगिक समानता परिवर्तन कार्यक्रम टप्पा २ सुरू

धाराशिव दि २५ (प्रतिनिधी):- किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी नावीन्यपूर्ण खेळांचा अभ्यासक्रमात समावेश करून धाराशिव जिल्हा प्रशासन आणि युनिसेफने मंगळवारी 25 जून रोजी लैंगिक समानता परिवर्तन कार्यक्रमाचा (जीटीपी) दुसरा टप्पा सुरू केला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, एसईआरटीच्या उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
यूएनजीईआय (युनायटेड नेशन्स गर्ल एज्युकेशन इनिशिएटिव्ह)-युनिसेफ यांनी तयार केलेला या अनोख्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा २०२२-२३ मध्ये कोरो इंडिया,स्वयं शिक्षण प्रयोग आणि मेन अगेन्स्ट वायलन्स अँड अब्यूज या संस्थांच्या भागीदारीतून राबवण्यात आला.धाराशिव जिल्ह्यातील चिंताजनक सामाजिक-आर्थिक निर्देशकांमुळे भारत सरकारने विकसनशील म्हणून गणना केली आहे.त्यामुळे या लैंगिक समानतेवर आधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी धाराशिवपासून करण्यात आली.
पहिल्या टप्प्यामध्ये युनिसेफने कनिष्ठ, मध्यम आणि माध्यमिक शाळांमधील ८-१६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळ-आधारित लैंगिक समानता परिवर्तनात्मक कार्यक्रम राबविला.हा कार्यक्रम वयानुरुप खेळ-आधारित अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीद्वारे ५० शाळांमधील (४० सार्वजनिक,१० खाजगी) ४,९५८ विद्यार्थ्यांपर्यंत (२,२९१ मुली,२,६६७ मुलगे) आणि १९३ शिक्षकांपर्यंत (४९ महिला, १४४ पुरुष) पोहोचला.
दुसऱ्या टप्प्याचा प्राथमिक भर हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये “मीना राजू मंच” कार्यक्रमांतर्गत इयत्ता ६-८ पर्यंतच्या वर्गांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. लैंगिक विषमता कमी करून,शाळांना प्रोत्साहन देणारे अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक,जिल्हा शिक्षण कार्यकर्त्यांसह स्थानिक समुदायाचे सदस्य यांच्यामध्येही जागरुकता आणण्याचा प्रयत्न यामाध्यमातून सुरू राहणार आहे.
लैंगिक विषमता आणि कठोर सामाजिक नियम यामुळे महिला आणि मुलींसाठी संधी मर्यादित होतात.त्यांच्या वैयक्तिक क्षमता आणि विकासात अडथळे निर्माण होतात. जिल्ह्यात लैंगिक समानतेवर आधारित कार्यक्रम अंमलबजावणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून हळूहळू परिवर्तनही दिसून येत आहे.ही आनंदाची बाब आहे.मला आशा आहे की,दुसऱ्या टप्प्यातही हा उपक्रम जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचून लिंग-परिवर्तनात्मक दृष्टिकोनाला मुख्य प्रवाहात आणील,” असे डॉ. घोष यावेळी म्हणाले.
पहिल्या टप्प्यातील निकालांवर समाधान व्यक्त करतांना एससीईआरटीच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे म्हणाल्या की,या कार्यक्रमामुळे लैंगिक समानतेविषयी जागरुकता नक्कीच साधली गेली आहे.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी केवळ ‘स्वयंपाक बनवणे’ ही बाब केवळ १४ टक्के मुलांनी पुरुष आणि स्त्रिया दोघांशी जोडली.मात्र,कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर हीच संख्या ९३ टक्क्यापर्यंत वाढली.यामुळे लैंगिक समानतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला असून आम्हाला विश्वास आहे की,दुसऱ्या टप्प्यात अधिक बदल मुलांमध्ये घडून येतील. असे त्या म्हणाल्या.