Blog

लोकसभा निकालानंतर राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका होणार?

मुंबई:- (प्रतिनिधी):- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला चांगले यश मिळणार, अशी खात्री राज्याचा विद्यमान महायुती सरकारला असल्याने निकालानंतर याच यशाचा फायदा घेण्यासाठी आठवडाभरात विधानसभा बरखास्त करुन राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घोषित केल्या जाऊ शकतात, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून ४ जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्याचे विद्यमान महायुती सरकार व विरोधी महाविकास आघाडीत सरळ सरळ लोकसभा निवडनुकांच्या लढती झाल्या आहेत.

या दोन्ही गटांचे, तसेच महाराष्ट्रातील मतदारांचे कोण हारणार कोण जिंकणार याकडे लक्ष लागले असून ४ जूनच्या निकालात महायुतीला ३५ ते ३८ जागा मिळतील, असा प्रशासनाचा गोपनीय अहवाल महायुती सरकारला मिळाला असल्याने सध्याच्या राज्यातील विविध मुद्यातून ढवळलेल्या वातावरणाच्या स्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत मिळणारे ‘हे यशही नसे थोडके’ असे महायुतीला वाटते. त्यामुळे विद्यमान विधानसभा लोकसभा निवडणूक निकालानंतर बरखास्त करुन राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक घोषित केली जाऊ शकते, असे सूत्रांकडून समजते.दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) तिन्ही पक्ष मिशन विधानसभा म्हणून पक्ष्याच्या बैठकांचे आयोजन केले जाऊ शकते. त्या अनुषंगाने यापैकी अजित पवार गटाची २७ तारखेला महत्वाची मिशन विधानसभा बैठक मुंबई येथे होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवारी (ता. २७ मे) रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मंत्री, आजी-माजी खासदार-आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनी निमंत्रित केले असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button