ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडबड कराल तर खबरदार!

अलिबाग :प्रतिनिधी सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे, हे वास्तव आहे. याला रायगड जिल्ह्याचाही अपवाद नाही. ही बाब लक्षात घेऊन या तिसर्‍या डोळ्याची अधिक मदत घेऊन जिल्ह्यातील लोकांची आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ ही संकल्पना त्यांनी मांडली असून ती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांसह गर्दीच्या ठिकाणांवर प्रत्येकाच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांसह २८ पोलीस ठाणी आहेत. जिल्ह्यात १ हजार ८०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच जिल्ह्यातील लाखो लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कामांव्यतिरिक्त अनेक गुन्ह्यांची उकलही पोलिसांमार्फत केली जाते. गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज मोठ्या प्रमाणात होते.

जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे जिल्ह्यातील अनेक भागात पसरवून गुन्हेगारी आणि अनुचित प्रकार रोखण्याचा प्रयत्न रायगड पोलीस दलामार्फत केला जाणार आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ हे अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बाजारपेठांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रस्त्यावरील प्रत्येक हालचालीवर कॅमेरातून लक्ष ठेवले जाणार आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

जिल्ह्यात हजार नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उद्देश आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे अधिक पसरणार आहे.

गुन्हेगारीला ब्रेक लागणार!

सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्हे उघड झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दुकानाबाहेर रस्त्यावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसवण्याचा प्रयत्न आहे. यातून महिला सुरक्षेबरोबरच अन्य गुन्हेगारीलाही ब्रेक लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button