जिल्ह्यात वन्यजीवांसाठी जीवनदायी पाऊल *महामार्गालगत १०० पाणवठ्यांची उभारणी*

धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गालगत वन्यजीव रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तामलवडी टोल प्लाझा ते पारगाव टोल प्लाझा या महामार्गाच्या दरम्यान एकूण १०० पाणवठ्यांची उभारणी केली जात असून,प्रत्येक पाणवठा सुमारे ७०० लिटर क्षमतेचा आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाजवळच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.त्यामुळे प्राण्यांना पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडण्याची गरज भासणार नाही,आणि अपघातांमुळे होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय घट होणार आहे.
या अभिनव उपक्रमासाठी संकल्पना आणि निधी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उपलब्ध करून दिला असून,प्रत्यक्ष अंमलबजावणी सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव यांच्यामार्फत होत आहे. विभागाच्या वतीने हे काम अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्धरीत्या पार पडत असून, वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
या पाणवठ्यांना दर आठवड्याला एकदा व आवश्यकतेनुसार महिन्यात चार वेळा पाणी पुरवले जाणार आहे. तसेच,पाण्याच्या स्वच्छतेसाठी नियमित देखरेख आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून प्राण्यांना सुरक्षित आणि निर्मळ पाणी मिळू शकेल.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या उपक्रमास “वन्यजीवांसाठी संजीवनी” असे संबोधले असून, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.विभागीय वन अधिकारी यांनीही विभागाच्या वतीने वन्यजीवांच्या हितासाठी कटिबद्धतेची ग्वाही दिली आहे. हा उपक्रम वन्यजीव संरक्षण आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने एक आदर्श पायंडा ठरेल.
*******