संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पंढरपूर :- (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी वारी करिता प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी असलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे कोथळी-मुक्ताईनगर येथून लवाजम्यासह भक्तीपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले.मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्य राज्यभरातून व शेजारी मध्यप्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. 27 दिवस प्रवास करुन 14 जुलैला हा पालखी सोहळा पंढरपूरात पोहोचणार आहे. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे.प्रस्थानानिमित्त मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी विधीवत मुक्ताबाईंच्या पादुकांची पुजन केली. पंचपदी भजनानंतर आरती, मुक्ताबाई… मुक्ताबाई… जयघोष करित ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पादुका डोक्यावर घेऊन पालखीत ठेवल्या. भक्तीमय वातावरणात पालखी मंदिर परिक्रमा करित रथात ठेवून प्रस्थान पार पडले.हजारो वारकरी रणरणत्या उन्हातही मुक्ताबाई भजनात तल्लीन झाले होते. शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतून नविन मुक्ताबाई मंदिररात विसावा घेतला. यावेळी संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे, सम्राट पाटील, मुक्ताबाई फडावरील सर्व दिंडी प्रमुख कीर्तनकार आदि उपस्थित होते.