धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा निरीक्षक श्री.विजय चौधरी यांची माहिती

धाराशिव :- (प्रतिनिधी) धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा निरीक्षक श्री.विजय चौधरी यांनी दिली. धाराशिव लोकसभा मतदारसंघात झालेल्या महायुतीच्या पराभवाची कारणमीमांसा करुन आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आवश्यक तेथे दुुरुस्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी (दि.18) धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे मा.आमदार सुजितसिंह ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.संताजीराव चालुक्य पाटील, मा.जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.अनिल काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.व्यंकटराव गुंड, अॅड.अनिल काळे, अॅड.खंडेराव चौरे, डॉ.गोविंद कोकाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, डॉ.गोविंद कोकाटे, अॅड.नितीन भोसले, इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेश सरचिटणीस श्री.चौधरी म्हणाले, भारत देशाच्या प्रधानमंत्री पदाची सुत्रे तिसर्यांदा हाती घेतल्यानंतर श्री.नरेंद्र मोदीजी यांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून आभार व्यक्त करण्याचा ठराव आढावा बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर आवास योजना अधिक गतिमान करणे, जागतिक योगदिन सर्वत्र साजरा करणे, वृक्षारोपण, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती व पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करणे, प्रधानमंत्री श्री.मोदीजी यांचा मन की बात हा कार्यक्रम सर्व स्तरावर दाखवणे, बोगस मतदान टाळण्यासाठी मतदार यादीमधील दुरुस्ती आणि नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच मतदान केंद्राचे अंतर कमी करण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या प्रधानमंत्रीपदी श्री.नरेंद्र मोदीजी तिसर्यांदा विराजमान झाल्याने देशाला महासत्ता करण्याचे स्वप्न पूर्णत्त्वास जाणार आहे. गेल्या दहा वर्षात श्री.मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जाचक 370 कलम हटविणे, हिंदुंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम मंदिराची पुर्ननिर्मिती, प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यावर दरवर्षी रक्कम जमा करणे, 11 कोटी गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन, 60 कोटी जनतेला आयुष्मान भारत योजनेंतर्गत वेगवेगळ्या आजारांवर 5 लाखापर्यंत मोफत उपचार अशा कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळेच जनतेने प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून सत्ता दिली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रस्ते, आरोग्य आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यानी आढावा बैठकीत दिलेल्या आहेत. देशात आणि महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे त्याबाबतही तात्काळ कार्यवाही करुन हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.
नाना पटोलेंचा निषेध
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतल्याचे वृत्त अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी अथवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर एखादी महिला आल्यास तिच्या पाया पडून दर्शन घेतात. मात्र काँग्रेसचे नेते मात्र कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात, ही लाजिरवाणी बाब असून काँग्रेसला सत्तेचा माज चढल्याचे यावरुन दिसत आहे. पुढे कदाचित यांची सत्ता आल्यानंतर ते जनतेकडूनही पाय धुवून घेतील. म्हणून आपण या घटनेचा निषेध करत असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.
जातीय तेढ महाराष्ट्राला शोभणारी नाही
महाराष्ट्र राज्यात सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काहीजण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहु महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संत-महंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला ही बाब शोभणारी नाही. देश आणि धर्मासाठी लढणार्या या राज्यातील जनतेने यावरुन बोध घेण्याची गरज श्री.चौधरी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात काही ठिकाणी फटका
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षाकडून अपप्रचार करण्यात आला. भाजपा सरकार निवडून आल्यास भारतीय संविधान बदलण्यात येईल, आरक्षण काढून घेण्यात येईल असा चुकीचा समज पसरविण्यात आला. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचा काही ठिकाणी फटका बसला असल्याचे यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा निरीक्षक श्री.चौधरी यांनी स्पष्ट केले.