ताज्या बातम्यापुणे

पुणे आरोपतील वकील शरद पवारांचा ; नितेश राणेंच्या आरोपाचा अजित दादांनी घेतला खरपूस समाचार

पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही ऊत आला आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवून देण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला.अग्रवाल कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अग्रवाल कुटुंबाने जे वकील दिले आहेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे माहिती आम्हाला मिळाली आहे,” असा दावा नितेश राणे यांनी केला होता. मात्र राणेंच्या या दाव्याचा आता महायुतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जोरदार समाचार घेतला आहे.

नितेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “आज देशात हरीश साळवे हे प्रख्यात वकील आहेत. उद्या तुम्ही एखादे प्रकरण त्यांच्याकडे दिले, तर ते लगेच तुमचे वकील होणार नाहीत. उद्या आणखी दुसऱ्या कोणाची केस असेल तर ते तिकडे जाणार. सगळ्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की, असं कोण कुठला वकील कोणाला देत नाही. बाबांनो, ही सगळी बकवास आहे. असे आरोप करून आपण या प्रकरणाची दिशा दुसरीकडेच घेऊन जात आहोत. जो वकील दिलाय त्यालाच विचारा की, तुला कोणी नेमला? तुला कोणी केस लढवायला दिली? हे त्या वकिलालाच विचारा,” अशा शब्दांत अजित पवार यांनी नितेश राणेंना घरचा अहेर दिला आहे.
आरोप करताना नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. “नेहमी बोलणाऱ्या, प्रत्येक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया का येत नाहीत? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का? अग्रवाल कुटुंबाने जे वकील दिले आहेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची आमची माहिती आहे,” असा आरोप नितेश राणेंनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button